Deep Thoughts

देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर.
देव देहात देहांत, का हो जाता देवळात?
हा तुकारामांचा अभंग जवळपास सर्वांनीच ऐकला आहे. मीही ऐकला होता परंतु याची अनुभूती मात्र आज येतेय. त्याच्यात आणि आपल्यात तसा फार फरक नाही काही दिव्य चमत्कार सोडले तर. आपल्यातच तो आपला परमपिता रहातोय. तोही एकटाच प्रकटला आपण सुद्धा एकटेच जन्मलो. त्याच्या समोर ही शून्यरूपी पृथ्वी होती तर आपल्या समोर हे शून्यरूपी आयुष्य आहे. त्याने प्रकृतीच्या साहाय्याने या शून्यावर विश्व स्थापित केले. आपण देखील आपल्या विश्वात या छोट्याशा कालमर्यादा असलेल्या आयुष्यात सुखाची आनंदाची बाग वसवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. फरक फक्त इतकाच की, आपल्या बागेत चार गुलाब नि दोन तीन झाडं असतात. पण देवाच्या बागेत अख्खी पृथ्वी सामावलेली असते. तो प्रयत्न करतो तिला फुलवायचा, बहरायचा. कधी यशस्वी होतो तर कधी अपयशाने दुःखीही होतो. आपण तरी आपले दुःख वाटून घेतो. तो तर एकटाच सारे सहन करतो. डोळ्यांतले अश्रू नको दिसायला म्हणून पाण्यातच, अथांग सागराच्या तळाला तो रहातो. मला वाटत त्याच्या अश्रुंमुळेच सागराचे पाणी खारे असावे.
         कधी कधी दुःखातिरेक किंवा क्रोधाग्नीने देव सुद्धा हे शून्य म्हणजे त्याची लाडकी पृथ्वी विस्कटून टाकतो. ज्याला आपण डिझास्टर म्हणतो. अगदी आपल्या सारखंच सेम टु सेम..! आणि मग पुन्हा शून्याचा प्रवास सुरु. भानावर तोही येतोच आपल्या सारखा आणि मग एकेक काडी तोही पुन्हा जमा करायला लागतो. विस्कटलेले शून्य पुन्हा उभे करण्याकरिता, या शून्याचे चोचले पुरवण्यात आपला हाडामांसाचा देह थकून जातो, पण शून्यावर आपले प्रेम ईतके की पुन्हा नव्या देहाने जन्म घेतो. आणि विखुरलेले शून्य पुन्हा जोडायला सुरुवात करतो.
        देवाचं आणि मानवाचं हेच तर आहे शुन्याचं नातं. तुटलेलं जोडायचं आणि विस्कटलेलं आवरत रहायचं. हा अनादी अनंत काळापासून चालत आलेला खेळ खेळत रहायचं. हीच तर विष्णूची माया आहे. शून्याचा हा प्रवास शून्यावर संपवून पुन्हा शून्यातूनच सुरुवात करीत राहायची. उत्पत्ती - स्थिती - लय. कधी कधी एकाच जन्मात कित्येकदा शून्यातून विश्व निर्माण करावे लागते. कालाय तस्मै नमः..! म्हणत आलेल्या प्रसंगाला तोंड द्यावे लागते. गत जन्माच्या पाप पुण्यातीत कर्मांवर आपले प्राक्तन अवलंबून असल्याने ही सारी श्रीहरीची माया आहे.

                                                                सौ. दीप्ती मेथे

                                                                       मुंबई

Comments

Post a Comment